आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *७*
*आम्ही बौद्ध का झालो?*
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *७*
--------------------------------
*बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*
या देशामध्ये आम्ही हजारो वर्षापासून खुपच निराशेच्या अवस्थेत जगत आलो आहोत. जोपर्यंत ही अवस्था राहील तोपर्यंत आमची प्रगती होणे अशक्य आहे. *अन्याय आणि असमानतेवर आधारित असलेल्या हिंदु (ब्राह्मण) धर्मात राहून आम्ही काहीही करू शकत नाही.* मनुस्मृती या ग्रंथात चातुर्वर्ण्याचे समर्थन केले आहे. ही चातुर्वण्य व्यवस्था मनुष्यमात्राच्या उन्नतीकरिता घातक आहे. शुद्रांचे काम फक्त सेवा करणे, त्यांनी शिक्षण कशाला घ्यावयाचे? या समस्येच निराकरण कसे होणार? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना शुद्रांच्या गुलामीपासून खुप फायदा आहे. परंतु शुद्रांकडे गुलामीशिवाय काहीच नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्था फुंकर मारून उडवावी एवढी सोपी निश्चित नाही. ही केवळ रुढी न राहता हा एक धर्म बनला आहे.
*हिंदु धर्मात कुठलीही समानता नाही.* मी एकदा गांधींना भेटण्यास गेलो होतो. तेव्हा गांधी मला म्हणाले, ते चातुर्वर्ण्य व्यवस्था मानतात. पण हा चातुर्वर्ण्य कोणते व कसे? ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी मी बोटे एकावर एक करून दाखवली व म्हणालो हा चातुर्वर्ण्य असा आहे, का यांच्या उलट? याचा प्रारंभ आणि शेवट कुठे आहे? गांधी माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. *ज्या लोकांनी आमचा नाश केला त्यांचा हा अन्यायपूर्ण धर्म त्यांच्यासमोरच नष्ट होईल,* मी हिंदुधर्मावर उगीच आरोप करीत नाही. हा धर्म नष्ट झालेला आहे. या धर्मात काहीही शिल्लक राहिले नाही. हा धर्म मृत्यूपथाला लागला आहे.
*आमचा देश विदेशी लोकांचा गुलाम का झाला?* युरोपमध्ये १९३९ पासून १९४५ पर्यंत दुसरे महायुद्ध चालू होते. जेवढी फौज लढाईत मरत असे तेवढीच फौज रोज भर्ती होत असे. त्यावेळी असे कुणी म्हटले नाही की युद्ध जिंकण्याचे श्रेय कुणाला एकालाच प्राप्त झाले. हे सर्व देशवाशियांचे महान श्रेय होते. आमच्या देशाची गोष्टच वेगळी आहे. *क्षत्रिय मेले की सर्व देश मरत असे हेच कायम होत राहिले.* तात्पर्य क्षत्रियांनी शत्रूला जिंकले की याचा अर्थ सर्व देश जिंकला असा होत असे आणि म्हणूनच देश कित्येक वेळा गुलाम बनला. जर *आमच्या लोकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा महान देश कधीही गुलाम बनला नसता.* व *ना कधी कुठल्या शत्रूने आक्रमण करून या देशाला जिंकले असते.* हिंदुधर्मात राहून कोणाचाही उध्दार होणार नाही. हिंदुधर्माच्या रचनेनुसार संख्येने कमी असलेल्या परंतु तथाकथित सवर्णांनाच पहिल्यापासून फायदा होत आला आहे. ह्या कथनात तिळमात्र खोट नाही. *शुद्र आणि अस्पृश्यांचा काय फायदा झाला?* ब्राह्मणाची स्त्री जर गर्भवती असेल तर तिचं लक्ष याकडे असते की, *उच्च न्यायालयात कुठले न्यायाधिशाचे पद रिकामे आहे का?* याउलट आमची स्त्री गर्भवती असेल तर तिचे लक्ष इकडे असते की कुठे झाडू मारणाऱ्याची जागा रिकामी आहे का? ही दुरावस्था हिंदुधर्माच्या व्यवस्थेमुळे आहे. या धर्मात राहून आमचे काहीही भले होणार नाही. जर *आमची प्रगती व्हायची असेल तर केवळ बौद्ध धम्मातच होईल.*
क्रमशः वाचा
---------------------------------
✒️ मिशनरी
भिमराव मुनेश्वर.
Comments
Post a Comment