आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. १०
आम्ही बौद्ध का झालो?
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *१०*
--------------------------------
बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,
उत्तरपश्चिम प्रातांत एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलींद (मिनांडर) त्याला धर्मचर्चेची फार आधड होती. हिंदु धर्माच्या शास्त्रपंडितांना कित्येक वेळा वादविवादात त्याने पराभूत केले होते. आणि कित्येकांना निरुत्तर केले होते. एके दिवशी त्याने विचार केला की बौद्धधम्माच्या विद्वान लोकांशी वादविवाद करावा. त्यासाठी त्याने आपल्या सेवकांना आदेश देऊन ठेवला होता की, त्याच्या राज्यात जर कोणी बौद्ध धम्माचा पंडित आला तर त्याला माझ्याकडे घेऊन या. तेव्हा स्थानिय बौद्ध लोकांनी धम्मधुरंधर भिक्खू नागसेन यांच्याकडे विनंती करून राजा मिलिंद बरोबर वादविवादास प्रवृत्त केले. भिक्खू नागसेनांचा राजा मिलिंद बरोबरचा जो विवाद झाला तो वादविवाद *'मिलिंदप्रश्न'* या पुस्तकात छापला आहे.
मिलिंद राजाने एक प्रश्न विचारला होता की, *धर्माचा ऱ्हास का होतो?* नागसेन भिक्खूनी या प्रश्नाचे उत्तर देतांना तीन कारणे सांगितली होती,
पहिले कारण हे सांगितले होते की, जो धर्म खरा असतो तोच कायमस्वरूपी टिकून राहतो. ज्या धर्माच्या मूळ पायात गंभीरता नसते तो धर्म काळधर्म असतो काही ठराविक काळानंतर या धर्माचा ऱ्हास होतो.
दुसरे कारण हे आहे की, धर्मप्रचार करणारे विद्वानच शिल्लक राहत नाही त्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो. ज्ञानी लोकांनी धर्मज्ञानाची चर्चा केली पाहिजे. विरोधकांचा वादविवादात पराभव करणारे धर्मप्रसारक विद्वान नसतील तर धर्माचा ऱ्हास होतो.
तिसरे कारण हे आहे की, धर्म आणि धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात, साधारण लोकांसाठी मंदिरे आणि विहारे असतात. जिथे जाऊन लोक आपल्या श्रध्दास्थानी असलेल्या विभूतींची पुजा करतात.
आपण बौद्ध धम्माचा स्विकार करतेवेळी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.बौद्ध धम्माची तत्वे काही काळासाठी आहेत अशी समजूत करून घेऊ नये. आज २५०० वर्षानंतरही बुध्दांच्या तत्वांना सारे जग मानत आहे. अमेरिकेत बुद्ध धम्माच्या अनुयायांच्या २००० च्या वर संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्धविहार बांधले आहे. जर्मनीमध्ये तीन-चार हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्ध तत्व आजही अजरामर आहे. तरीही बुध्दांने असा दावा केला नाही की माझी तत्वे महान आहेत. आणि ते असेही कधी म्हणाले नाही त्यांचा धर्म ईश्वरीय आहे. तथागत बुद्ध स्वतः म्हणाले होते की माझे मातापिता दोघेही सामान्य मनुष्यासारखे आहेत, ज्यांना हा धर्म चांगला वाटेल त्यांनीच त्याचा स्विकार करावा. इतकी उदारता तुम्हाला अन्य कोणत्याही धर्मात मिळणार नाही.
...................
Comments
Post a Comment