आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १४ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *१*

*आम्ही बौद्ध का झालो?*
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
नागपूर १४ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *१*
--------------------------------
*बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*
       आज मी माझ्या भाषणात या महत्वपूर्ण विषयावर विचार प्रकट करणार आहे, की तथागत बुध्दांनी सांगितलेल्या धम्माच्या प्रचाराची व पुनरुज्जीवनाची धुरा मी माझ्या खांद्यावर का घेतली आहे? माझ्याबरोबरच अनेक विचारवंतांचे असे मत होते की, काल झालेला धर्मांतर सोहळा आज व्हायला हवा होता व आज जे धर्म परिवर्तनाबाबत अभिभाषण होत आहे ते धर्मांतरापूर्वी व्हायचे होते, परंतु जे व्हायचे ते झाले आता या प्रश्नावर विचार करणे महत्त्वाचे नाही.
       बऱ्याच लोकांनी मला असा प्रश्न केला की, धर्मांतर सोहळ्यासाठी *नागपूर* शहराला निवडण्याचे कारण काय? दुसरे महत्त्वाचे स्थान का निवडले नाही? काहीजणांचे असे मत होते की, या शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्य केंद्र आहे या हिंदुत्ववाद्यांपुढे काहीतरी करून दाखविण्याच्या हेतूने मी हे स्थान निवडले.परंतु हे साफ खोटे आहे, माझा असा कुठलाही उद्देश नाही. अशा निरर्थक गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही. ज्या महान कार्याचा भार मी माझ्या खांद्यावर घेतला आहे ते इतकं महत्वपूर्ण आहे की, एक मिनीटही माझ्यासाठी महत्वाचा आहे. या स्थानाला निवडते वेळी एका क्षणासाठीही माझ्या मनात आर.एस.एस. चा विचार आला नाही.
       ज्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी या देशाच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला आहे. त्यांना हे माहित असेल की, तथागत बुध्दाच्या धम्माच्या प्रसाराचे अधिक श्रेय *"नाग"* लोकांकडे जाते. *नागलोक* हे आर्यांचे कट्टर शत्रू होते. आर्य व अनार्य (नागलोक) यांच्यात आपापसात नेहमीच छोटी - मोठी युध्दे होत असत. आर्यलोक नागलोकांचा समुळ नाश करण्याची इच्छा बाळगून होते. या संदर्भात बऱ्याच पुराणकथा आहेत जसे अर्जुनाने नागांना जिवंत जाळले होते. अगस्त ऋषीने सर्प या नागाची रक्षा केली होती त्याच वंशाचे आपण सर्वजण आहोत. या नागांना कपटाने अस्पृश्य बनविले गेले. या अवस्थेतून उठण्यासाठी त्यांना एका महापुरुषाची आवश्यकता होती, त्यांना तो महापुरुष तथागत बु़ध्दांच्या रुपात मिळाला. नाग लोकांनीच संपूर्ण भारतात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला. आपण सर्वजण नागांची मुले म्हणजेच नागवंशीय आहोत. वीर नागांची प्रमुख जनसंख्या नागपुरात होती, यामुळेच या स्थळाला नागपूर असे नाव पडले, नागपूर पासून २७ मैल अंतरावर *नागनदी* आहे. या सर्व गोष्टींवरून हे सिद्ध होते की, या नदीच्या आसपास नागांची जनसंख्या जास्त आहे. नागपूर या शहराला निवडण्यामागचे हेच एकमेव कारण आहे.
       यामागे दुसरे कुठलेही कारण नाही, तरी या संदर्भात कोणाचीही कुठलीही गैरसमजूत होऊ नये. दुसऱ्या कारणासाठी स्वंयसेवक संघाचा विरोध संभव आहे. परंतु या स्थानाला निवडण्यामागे दुसऱ्याला चिडवण्याचा कुठलाही उद्देश नाही.

       क्रमशः वाचा

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य